टेलिकॉम रेग्यूलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. TRAI ने नुकतेच टेलिकॉम टॅरिफ आदेश जारी केला असून, यात टेलिकॉम प्रोव्हाइडर्सला २८ दिवसांऐवजी ३० दिवसांच्या वैधतेसह येणारे रिचार्ज प्लान्स सादर करण्याचे आदेश दिले आहेत. टेलिकॉम कंपन्यांना ट्रायच्या नवीन आदेशांतर्गत ३० दिवसांच्या वैधतेसह येणारे प्लान नॉटिफिकेशन जारी झाल्यापासून ६० दिवसांच्या आत सादर करावे लागणार आहेत.

ट्रायच्या नवीन आदेशानुसार, प्रत्येक टेलिकॉम कंपन्यांनी कमीत कमी एक प्लान वाउचर, एक कॉम्बो वाउचर आणि एक स्पेशल टॅरिफ वाउचर असा सादर करायला हवा ज्याची वैधता २८ दिवसांऐवजी पूर्ण ३० दिवस असेल. ग्राहकांना या प्लान्सला पुन्हा रिचार्ज करायचे असल्यास, त्या ठराविक तारखेपासूनच करता येईल, अशी तरतूद असायला हवी. काही दिवसांपूर्वी वापरकर्त्यांनी तक्रार केली होती की, टेलिकॉम कंपन्या महिन्याभराचा पूर्ण रिचार्ज देत नाही. टेलिकॉम कंपन्या एका महिन्यात ३० दिवसांऐवजी २८ दिवसांच्या वैधतेसह येणारे प्लान्स देत आहेत. त्यानंतर आता ट्रायने टेलिकॉम कंपन्यांना हे नवीन आदेश जारी केले आहेत.

खासगी टेलिकॉम कंपन्या जसे की Airtel, Reliance Jio, Vodafone-Idea (VI) या एका महिन्याच्या रिचार्जच्या नावाखाली ३० ऐवजी २८ दिवसांची वैधता देतात. ग्राहकांच्या मते कंपन्या दरमहिन्याला २ दिवस कपात करून वर्षभरात २८ दिवस वाचवतात. या हिशोबाने वर्षभरात १२ ऐवजी १३ महिन्यांचे रिचार्ज करावे लागते. याच प्रमाणे दोन महिन्यांच्या रिचार्जमध्ये ५४ किंवा ५६ आणि तीन महिन्यांच्या रिचार्जमध्ये ९० दिवसांऐवजी ८४ दिवसांची वैधता दिली जात आहे. TRAI च्या आदेशानुसार ज्याप्रमाणे २ दिवस वाढवले जाणार आहेत त्याचप्रमाणे दोन दिवसांचे वाढीव दर देखील कंपन्या आकारू शकतात. आणि असे झाल्यास या निर्णयामुळे ग्राहकांना मिळणाऱ्या थोड्याफार दिलास्यावरही विरजन पडेल.

Share.