मुंबई :
bank updates गेल्या काही दिवसांपासून आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कामात चुका, नियमांचे पालन न केल्याने तसेच गैरव्यवहार करणाऱ्या बँकांवर कारवाईचा सपाटा लावलेला आहे. या कारवाईच्या कचाट्यात अनेक बँका अडकल्या. आता पुन्हा एकदा आरबीआयने महाराष्ट्रातील एका बँकेवर कारवाई करत दंड भरण्याची शिक्षा दिली आहे. यात बँकेला 15 लाख रुपयांचा दंड भरण्यास सांगितले आहे. ठाणे भारत सहकारी बँक लिमिटेडवर कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे भारत सहकारी बँक लिमिटेडने ग्राहकांच्या हिताची काळजी घेतली नाही, असा प्रकार घडला आहे. याच मुद्द्यावरून आरबीआयने कारवाईचे बडगा उगारला आहे. अनधिकृत इलेक्ट्रॉनिक बँकिंग व्यवहारांमध्ये ग्राहकांच्या हिताची काळजी न घेतल्याबद्दल ठाणे भारत सहकारी बँक लिमिटेडला आता मोठा फटका बसला आहे.
यावेळी अजुन४ बँकांवर कारवाई करण्यात आली आहे. बंगळुरू येथील कर्नाटक स्टेट को-ऑपरेटिव्ह अॅपेक्स बँक, झाशी येथील राणी लक्ष्मीबाई अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, तामिळनाडूच्या तंजोर येथील निकोल्सन को-ऑपरेटिव्ह टाऊन बँक, राउरकेला येथील अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक या बँकांवर कारवाई करण्यात आली आहे.
यापूर्वीही महाराष्ट्रातील विविध बँकांना आरबीआयने दंड केले आहेत. महाराष्ट्रातील अनेक सहकारी बँकांनाही हा दंड भरावा लागलेला आहे. आजवर अनेक कारवाय आरबीआयकडून करण्यात आलेल्या आहेत. यापैकी आजवरचा सर्वाधिक दंड विशाखापट्टणम सहकारी बँकेला भरावा लागला आहे. जेव्हा बँकेला दंड ठोठावला तेव्हा ही रक्कम सर्वाधिक म्हणजेच तब्बल 55 लाख रुपये होती.

Share.