NASHIK नाशिक शहरातील द्वारका परिसरात कबीरनगर झोपडपट्टीत भीषण आग लागली आहे. या घटनेत आतापर्यंत चार सिलिंडर्सचा स्फोट झाल्याची माहिती आहे. अग्निशमन दलाच्या सर्व केंद्रांना अलर्ट देण्यात आला आहे. अग्निशमन दलाचे १० बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. यासोबत १०८ क्रमांकाच्या दोन रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना झाल्या आहेत.

नाशिकच्या द्वारका येथील आगीत तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भीषण आगीमुळे आजूबाजूचे रहिवासी हे घरातील सिलिंडर घेऊन रस्त्यालागत बसले आहेत. आगीमुळे नागरिकांची धावाधाव सुरू आहे. खबरदारी म्हणून सारडा सर्कल, वडाळा नाका, द्वारकाकडे जाणारे रस्ते बंद करण्यात आले आहेत.

अझहर शेख, नाशिक: शहरातील द्वारका परिसरात असलेल्या संत कबीर नगर झोपडपट्टीत आज संध्याकाळी ५ च्या सुमारास गॅस सिलींडरचा स्फोट होऊन भीषण आग लागली. एका घरातून सुरू झालेली आग अवघ्या अर्ध्या तासात संपूर्ण झोपडपट्टीत पसरली. एकापाठोपाठ एक तीन ते चार सिलिंडरचा स्फोट झाल्याचा अंदाज असून अग्निशमन दलाचे ११ बंब घटनास्थळी पोहोचले. अखेर तासाभरानंतर ही आग आटोक्यात आणण्यास अग्निशमन दलाला यश आले.

संत कबीर नगर झोपडपट्टी नाशिक शहरातील मोठी झोपडपट्टी मानली जाते. हा गावठाणचा परिसर असून अत्यंत दाट लोकवस्तीचा भाग आहे. संध्याकाळी एका घरात सिलिंडर स्फोटामुळे आग लागली आणि बघता बघता अनेक घरांनी पेट घेतला. त्यातील काही सिलिंडरचाही स्फोट झाल्याचं स्थानिकांनी सांगितलं. अनेक रहिवासी घरातील सिलिंडर घेऊन बाहेर पळाले.

घटनेचं वृत्त कळताच, अग्निशमन दलाच्या सहाही केंद्रावरचे दहा बंब आणि अंबड एमआयडीसीचा बंबही घटनास्थळी पोहोचले. अरुंद गल्ल्यांमुळे या गाड्या झोपडपट्टीबाहेरच उभ्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडचण येत आहे. चार रुग्णवाहिकाही घटनास्थळी तैनात आहेत.

Share.