केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाने थर्ड पार्टी इन्शुरन्स प्रीमियममध्ये वाढ करण्यासंदर्भात एक निवेदन जारी केले आहे. ही दरवाढ भारतीय बाजारात १ जूनपासून लागू होणार आहे. विशेष म्हणजे भारतीय विमा नियामक आणि विकास महामंडळ मंत्रालयाने (आयआरडीआय) यासंदर्भात निवेदन जारी केले आहे. आयआरडीआय ही देशातील विम्याची नियामक संस्था आहे. आधीच महागाईने त्रस्त असलेल्या सामान्य माणसांचा वाहन खरेदीचे स्वप्नापर्यंतचा प्रवासही नव्या नियमांमुळे अधिक खडतर होणार आहे.

थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये वाढ झाल्याने देशातील वाहनांच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या किमती वाढणार असून, सर्वसामान्य ग्राहकांचा खिसा आणखी कमी होणार आहे. भारतीय वाहन उद्योगाला आधीच मायक्रोचिप आणि कच्च्या मालाचा तुटवडा जाणवत असताना या निर्णयामुळे वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या संख्येवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकानुसार प्रमियम मोटरसायकच्या विम्यामध्ये १५ टक्क्यांची वाढ केली जाणार आहे. मात्र ही वाढ १५० सीसी पेक्षा अधिक इंजिन क्षमता असणाऱ्या गाड्यांना लागू होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने बजाज पल्सर, केटीएम आरसी ३९०, रॉयल एनफिल्ड बुलेट आणि याच क्षमतेच्या गाड्यांच्या समावेश होतो. मध्यम वर्गीयांसाठी चिंतेची बाब म्हणजे भारतामध्ये यापुढे कोणत्याही राज्यात दुचाकी घ्यायची असेल तर १७ टक्के अधिक रक्कम मोजावी लागणार आहे. आधीच वाहननिर्मिती कंपन्यांनी दरवाढ केली असून त्यात आता या नवीन नियमामुळे वाहने अधिक महाग होणार आहेत.

खासगी गाड्यांबद्दल बोलायचं झाल्यास १००० ते १५०० सीसी क्षमतेची इंजिन असणाऱ्या गाड्यांच्या थर्डपार्टी प्रमियममध्ये सहा टक्क्यांनी वाढ होणार आहे. आधीच गाड्यांच्या किंमती वाहननिर्मिती कंपन्यांनी वाढवल्याने त्या महाग झाल्या असून त्यात आता या अतिरिक्त सहा टक्क्यांचा भार थेट ग्राहकांवर पडणार आहे.१००० सीसी इंजिन असणाऱ्या नवीन गाड्यांसाठी थर्ड पार्टी विम्याची रक्कम २३ टक्क्यांनी वाढणार आहे. तर १००० ते १५०० सीसी क्षमतेच्या इंजिनच्या गाड्यांवरील प्रिमियममध्ये ११ टक्क्यांनी वाढ होणार आहे.

या वर्षाच्या सुरुवातीलाच मारुती सुझुकी, टोयोटा, महेंद्रा, टाटा या कंपन्यांनी आपल्या गाड्यांच्या किंमतींमध्ये वाढ केली. कच्च्या मालाचा पुरवठ्याला करोनामुळे फटका बसल्याने गाड्यांच्या किंमती वाढवण्यात आल्यात. याचदरम्यान दुचाकी बाजारातील वाहननिर्मिती कंपन्यांनीही गाड्यांच्या किंमती वाढवल्यात.

कितीने वाढणार विमा

प्रिमियम दुचाकी (१५० सीसीच्या वरील क्षमता असणाऱ्या) – १५ टक्क्यांनी वाढ
कार (१००० ते १५०० सीसी क्षमता असणाऱ्या) – ६ टक्क्यांनी वाढ
कार (१००० सीसीपर्यंत क्षमता असणाऱ्या) – २३ टक्क्यांनी वाढ
स्कुटर्स आणि मोटरसायकल (१५० सीसीपेक्षा कमी क्षमतेच्या) – १७ टक्क्यांनी वाढ

Share.