18 पैकी 12 खासदार आणि 22 माजी आमदार आमच्यासोबत येतील, असा मोठा दावा शिवसेनेचे बंडखोर नेते गुलाबराव पाटील यांनी केला आहे. सध्याच्या 55 आमदारांपैकी 40 आमदार आमच्यासोबत आहेत, असंही त्यांनी नमूद केलं. आता शिवसेना पक्ष आमचाच आहे आणि तो पुन्हा आम्ही बांधू, असेही ते म्हणाले. मुंबईहून जळगावला परतल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

गुलाबराव पाटील म्हणाले, “आमच्याकडे 55 पैकी 40 आमदार आहेत. १८ पैकी १२ खासदार आमच्याकडे येत आहेत. आता पक्ष कुणाचा तरी आहे, पण आमचा. मी स्वतः 4 खासदारांना भेटलो आहे. आमच्यासोबत 22 माजी आमदार असणार आहेत. आमचा पक्ष म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे. आम्ही हा पक्ष वाढवू. ते वैभव परत मिळवू या. ‘समस्त हिंदू बंधू, भगिनी आणि माता’ या बाळासाहेबांच्या शब्दांची पुनरावृत्ती पुन्हा महाराष्ट्रात करणार आहोत. त्यामुळे आम्ही बाहेर पडलो आहोत. “

‘गैरसमज झालेल्या कार्यकर्त्यांनी आरोप करणे स्वाभाविक आहे. आमची बाजू जाणून घेतल्याशिवाय ते आमच्यावर आरोप करतील, हेही आम्हाला माहीत होतं. मात्र, जळगावातील परिस्थिती शांत झाली आहे. मला वाटते की आम्ही सत्तेसाठी बाहेर नाही. आम्ही सत्ता सोडली,’ असं गुलाबराव पाटील म्हणाले.

“शिवसेना पक्ष संपेल अशी आम्हाला भीती वाटत होती”
‘लोक सरपंचपद सोडत नाहीत. आम्ही मंत्रालय सोडलं. 1 नाही तर 8 मंत्री बाहेर आले. याचाच अर्थ आम्हाला आमचा शिवसेना पक्ष वाचवायचा आहे. शिवसेना पक्ष संपून जाईल, अशी भीती आम्हाला वाटत होती. त्या शिवसेना पक्षाला वाचवण्यासाठी आम्ही सर्वांनी हा उठाव केला आहे,’ असं गुलाबराव पाटील म्हणाले.

“संजय राऊतांनी मी दिलेल्या मताची किंमत ठेवावी”
गुलाबराव पाटील पुढे म्हणाले, “मला संजय राऊत यांना उत्तर देण्याची गरज नाही. ते खासदार म्हणून बसलेत त्यात आमचंही एक मत आहे. त्यामुळे त्यांनी त्या मताची किंमत ठेवावी, एवढीच त्यांना विनंती राहणार आहे.” “मला मंत्रीपद तर मिळणारच आहे, ते साहजिक आहे. मला कोणतं खातं हवं यावर बोलायचं नाही. एकनाथ शिंदे जी जबाबदारी टाकतील ती जबाबदारी मी सांभाळेल,” असंही त्यांनी सांगितलं.

Share.