5G spectrum auction : ५जी स्पेक्ट्रमचा लिलाव संपला असून, यात देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या Reliance Jio ने सर्वाधिक बोली लावली. या लिलावात कंपन्यांकडून एकूण १,५०,१७३ कोटी रुपयांची बोली लावण्यात आली. यापैकी एकट्या रिलायन्स जिओने ८८,०७८ कोटी रुपये किंमतीचे स्पेक्ट्रम खरेदी केले आहेत. आता भारतातील यूजर्स ५जी रोलआउटची वाट पाहत आहेत. यावर्षीच्या अखेरपर्यंत भारतात ५जी सर्विस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. Reliance Jio ने याबाबत संकेत देखील दिले आहेत. कंपनी येत्या १५ ऑगस्टला देशात ५जी सर्विस सुरू करण्याची शक्यता आहे. याबाबत रिलायन्स जिओचे चेअरमन आकाश अंबानी यांनी संकेत दिले आहेत. आकाश अंबानी यांनी म्हटले आहे की, ‘आझादी का अमृत महोत्सव’ संपूर्ण भारतात ५जी रोलआउटसह साजरा केला जाईल.

आकाश अंबानी यांच्यानुसार, जिओ यूजर्सला जागतिक दर्जाची स्वस्त ५जी सर्विस उपलब्ध करेल. तसेच, जिओने स्पेक्ट्रमच्या लिलावात सर्वाधिक स्पेक्ट्रम खरेदी केले असून, याद्वारे कंपनी संपूर्ण देशात ५जी सर्विस लाँच करू शकते. ५जी स्पेक्ट्रमसाठी रिलायन्स जिओने लिलावात तब्बल ८८,०७८ कोटी रुपयांची बोली लावली. कंपनीकडे असे एअरव्हेव आहेत, जे दुसऱ्या कंपनीकडे नाहीत. जिओ एकमेव टेलिकॉम कंपनी आहे, जिच्याकडे ७०० MHz एअरव्हेव उपलब्ध आहेत. यामुळे जिओला इतर कंपन्यांपेक्षा अधिक फायदा मिळेल.

५जी स्पेक्ट्रमच्या नंतर आता लवकरच भारतात

५जी सर्विस सुरू होण्याची शक्यता आहे. देशातील प्रमुख टेलिकॉम कंपन्यांनी याबाबत तयारी देखील केली आहे. आता आकाश अंबानी यांनी देखील याबाबत संकेत दिले आहेत. त्यामुळे जिओ कशाप्रकारे संपूर्ण भारतात ५जी रोलआउट करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. यूजर्सकडे ५जी चा वापर करण्यासाठी तसे डिव्हाइस आणि 5G SIM असणे देखील गरजेचे आहे. ४जी च्या तुलनेत ५जी १० पट अधिक वेगवान असण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार, सुरुवातीला भारतातील अहमदाबाद, बंगळुरू, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, गांधीनगर, गुरुग्राम, हैद्राबाद, जामनगर, कोलकाता, लखनौ, मुंबई आणि पुणे या १३ शहरांमध्ये ५जी सेवा सुरू होईल. त्यानंतर टप्प्या टप्प्याने इतर शहरात ५जी रोल आउट केले जाईल.

Share.