Steel Price Today बांधकामासाठी लागणाऱ्या स्टीलच्या किमतीत गेल्या चार महिन्यांत कमालीची घट झाली असून, पोलादाचे दर प्रतिटन २० हजार रुपयांनी घसरले आहेत. साहजिकच आता बांधकाम खर्च कमी होण्याची अपेक्षा आहे.

यंदा मार्च महिन्यात ८५ हजार रुपये प्रतिटन असलेले स्टील २० हजारांनी कमी झाले आहे. सध्या पोलादाची किंमत सुमारे ६५ हजार रुपये प्रतिटन आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे मार्च महिन्यात पोलादाच्या किमतींनी प्रतिटन ८५ हजार रुपये या आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीपर्यंत मजल मारली. त्यानंतर स्टीलच्या किमतीत घसरण दिसून येत आहे. त्यामुळे किंमती घसरल्यामुळे केंद्र सरकारने स्टीलच्या निर्यातीवरील करात वाढ केली होती. त्याचा परिणाम निर्यातीवर झाल्याचे दिसून आले आहे. निर्यात शुल्कामुळे परदेशात जाणारे स्टील अधिक महाग झाले. याशिवाय काही पोलाद उत्पादकांनी निर्यातही कमी केली. पोलादाची मागणी कमी आहे. त्याचा परिणाम स्टीलच्या किमतीवरही झाल्याचे बोलले जात आहे. एकीकडे स्टीलला कमी मागणी आणि दुसरीकडे कच्च्या मालाचे भाव यामुळे पोलाद उद्योगाने उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील काही महिने स्टीलच्या दरात आणखी कपात होणार नाही, असे सांगितले जाते. आधीच स्टील उत्पादकांना मोठा फटका बसल्याने तोटा सहन करावा लागत आहे.

गेल्या एक-दोन महिन्यांपासून पोलाद उद्योगाने उत्पादन कमी केले आहे. बांधकाम क्षेत्रासह अन्य क्षेत्रांकडून मागणी वसूल व्हावी आणि दिवाळीच्या सुमारास स्टीलची मागणी वाढेल, अशी अपेक्षा स्टील उद्योजक व्यक्त करीत आहेत, असे स्टील समूहाचे सहसंचालक नितीन काबरा यांनी सांगितले. केंद्र सरकारने निर्यात शुल्कात वाढ केल्यामुळे भारताचा निर्यातीतील वाटा कमी झाला. अनेक उद्योजकांनी आपले उत्पादन कमी केले. केंद्राकडून निर्यात शुल्क कमी होईल, अशी अपेक्षा आहे. दिवाळीनंतर स्टील उद्योगाला चांगले दिवस येतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Share.