Tata Punch Becomes Fastest SUV to hit One lakh Sales Milestone : भारतीय वाहन बाजारात छोट्या एसयूव्ही वाहनांना जोरदार मागणी आहे. या सेगमेंटमध्ये टाटा मोटर्स कंपनीचा दबदबा असल्याचं पाहायला मिळत आहे. टाटा मोटर्सच्या दोन छोट्या एसयूव्ही बाजारात लाखो ग्राहकांना आकर्षित करत आहेत. या कार्स म्हणजे टाटा नेक्सॉन आणि टाटा पंच. दर महिन्याला देशात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या टॉप १० वाहनांची यादी पाहिली तर टाटाच्या या दोन कार तुम्हाला पहिल्या १० वाहनांमध्ये पाहायला मिळतील. टाटा पंच या कारने तर मोठी विक्रमी कामगिरी केली आहे. कंपनीने ही कार लाँच केल्यानंतर अवघ्या १० महिन्यांमद्ये या कारचे १ लाख युनिट्स विकले आहेत. टाटा मोटर्सने दावा केला आहे की, टाटा पंच ही सर्वात जलद १ लाख युनिट्स विक्रीचा टप्पा ओलांडणारी एसयूव्ही ठरली आहे.

टाटा पॅसेंजर व्हेईकल लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर शैलेश चंद्र म्हणाले की, “आमच्या ‘न्यू फॉरएव्हर’ पोर्टफोलिओमधी ही सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या एसयूव्हींपैकी एक आहे. टाटा मोटर्सने पंच एसयूव्ही ऑक्टोबर २०२१ मध्ये लॉन्च केली होती. तेव्हापासून ही SUV भारतीय कार बाजारात चांगली कामगिरी करत आहे.

टाटा मोटर्सच्या कामगिरीत सुधारणा

गेल्या काही महिन्यांपासून भारतीय बाजारात सर्वाधिक प्रवासी वाहन विकणाऱ्या कंपन्यांच्या यादीत टाटा मोटर्स ही कंपनी दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्थानी कायम राहिली आहे. कंपनीच्या या उत्कृष्ट कामगिरीचं बरचसं श्रेय टाटा पंच या छोट्या कारला देखील जातं.

टाटा पंच या कारमध्ये १.२ लीटर रेवोट्रोन इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन ५ स्पीड मॅन्यूअल आणि ५ स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह येतं. कंपनी आगामी काळात या कारच्या इंजिनमध्ये बदल करू शकते. कंपनी या कारमध्ये १.५ लीटर टर्बो पेट्रोल इंजिन देऊ शकते. तसेच १.५ लीटर टर्बो डिझेल इंजिनचा पर्याय देखील यामध्ये दिला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, टाटा मोटर्स कंपनी ही कार इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये लाँच करण्याची शक्यता आहे. कंपनी टाटा पंचच्या इलेक्ट्रिक व्हेरिएंटवर काम करत असल्याचं म्हटलं आहे.

टाटा पंचचे फीचर्स

टाटा पंच या छोट्या एसयूव्ही कारमध्ये कंपनीने ७ इंचांची टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम दिली आहे. तसेच यात ७ इंचांचं टीएफटी इन्स्ट्रूमेंट क्लस्टर देखील मिळेल. यामध्ये शानदार म्युझिक एक्सपीरियन्ससाठी ४ स्पीकर आणि २ ट्वीटर्स देण्यात आले आहेत. कंट्रोलिंगसाठी टाटा पंचमध्ये स्टीअरिंग माउंटेड कंट्रोल्स उपलब्ध आहेत. ऑफ रोडर्ससाठी टाटा पंच काझीरंगा एडीशन कार उपलब्ध आहे. या कारमध्ये ट्राय-अॅरो थीम डॅशबोर्ड आणि जेट ब्लॅक डायमंड कट अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत.

Share.