राज्यातील वाढत्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने पुन्हा एकदा काही कठोर पावले उचलली आहेत. राज्यात काल रात्री पासून ‘ब्रेक दि चेन’ मोहिमे अंतर्गत असणारे निर्बंध आणखी कठोर करण्यात आले आहेत. यासोबतच प्रवासावरील निर्बंधही अधिक कडक करण्यात आले असून राज्यात पुन्हा एकदा ई- पासची तरतूद करण्यात आली आहे.
या ई- पाससाठी रितसर अर्ज करण्याची आवश्यकता असणार असून, आंतरजिल्हा प्रवास करायचा असेल तर त्यासाठी ई-पास काढणं बंधनकारक करण्यात आलं आहे. त्यामुळे प्रवास करणाऱ्या नागरिकांना ई-पास कसा काढायचा याविषयी माहिती असणं आवश्यक आहे.
त्यामुळं यादरम्यानच्या काळात काही महत्त्वाच्या कारणासाठी प्रवास करण्याची गरज निर्माण झाल्यास नागरिकांनी ई- पासचा वापर करावा, असे आवाहन राज्यातील पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे.
ई-पास काढण्याची संपूर्ण प्रोसेस :
▪️ ई- पास मिळवण्यासाठी सर्वप्रथम https://covid19.mhpolice.in/ या संकेतस्थळाला भेट द्या. नंतर इथं ‘apply for pass here’ या पर्यायावर क्लिक करा.
▪️ त्यानंतर ज्या जिल्ह्यात प्रवास करायचा आहे, तो जिल्हा निवडावा.
▪️ नंतर आवश्यक कागदपत्र जोडावीत.
▪️ प्रवास करण्यासाठीचे अत्यावश्यक कारणही तेथे नमूद करावे लागेल.
▪️ कागदपत्र अपलोड करताना सर्व माहिती तपशील एकाच डॉक्युमेंटमध्ये घेऊन तो अपलोड करावा.
▪️ अर्ज केल्यानंतर तुम्हाला एक टोकन आयडी देण्यात येईल. तो सेव्ह करावा, त्यावरून अर्ज नेमका कोणत्या प्रक्रियेत आहे हे तुम्ही जाणू शकता. थोडक्यात या माध्यमातून तुम्हाला अर्जाचं स्टेटस तपासता येईल.
▪️ पडताळणी आणि आवश्यक विभागांची परवानगी मिळाल्यानंतर तुम्ही तोच टोकन आयडी वापरुन ई- पास डाऊनलोड करु शकता.
▪️ या ई पासमध्ये तुमची माहिती, वाहनाचा क्रमांक, पासची वैधता कालावधी आणि क्यूआर कोड असेल.
▪️ प्रवास करतेवेळी पासची मुळ प्रत आणि त्याची सॉफ्ट कॉपीही सोबत ठेवा. जेणेकरुन पोलिसांनी विचारलं असता त्यांना हा पास दाखवता येऊ शकतो.
ई-पाससाठीची आपत्कालीन कारणे
▪️ अत्यावश्यक सेवा
▪️ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वजनिक सेवा पुरविणाऱ्या व्यक्ती
▪️ मृत्यु झालेल्या व्यक्तीचे प्रथम नातेवाईक
▪️ तत्काळ वैद्यकीय उपचार
▪️ लग्न
▪️ अन्य (फक्त महत्वाचे)
दरम्यान, ज्यांना ऑनलाईन सेवेसाठीचा अँक्सेस मिळत नाही, अशा व्यक्तींनी सदर प्रक्रियेसाठी नजीकच्या पोलीस स्थानकाला भेट द्यावी. जिथे त्यांची मदत केली जाईल.