कोरोना विषाणूंवर मात करण्यासाठी जगात प्रत्येक देशाकडे लसीकरण हा एकमेव मार्ग आहे. तर मागील काही दिवसांपासून भारतात देखील लसीकरणला वेग आला आहे. देशात आताच्या घडीला ३ प्रमुख लसीचा वापर केला जातो 1) ‘सीरम’ची ‘कोविशील्ड’, 2) भारत बायोटेकची ‘को-वॅक्सीन’ आणि 3) रशियाची ‘स्पुटनिक- V’ यांचाच वापर केला जातो. परंतु आता लसीकरणाची टंचाई कमी होणार असून आता भारतात आणखी एक जगातील सर्वांत स्वस्त लस तयार होत आहे.
केंद्र सरकारने हैदराबाद मधील ‘बायोलॉजिकल ई’ या कंपनीला कोर्बेव्हॅक्स लसीच्या 30 कोटी मात्रांची ऑर्डर दिली आहे. या कोर्बेव्हॅक्स लसीचे दोन डोस भारत केवळ 500 रुपयांत मिळण्याची शक्यता आहे. यासाठी कंपनीला सर्वकारने 1500 कोटी रुपये ‘अॅडव्हान्स’ देण्याचा निर्णय घेतला आहे. हि लस ऑगस्ट ते डिसेंबर 2021 दरम्यान मिळू शकते.
‘बायोलॉजिकल-ई’ च्या लसीचे प्रत्येकाला दोन डोस असतील. पहिल्या डोसनंतर 28 दिवसांनी दुसरा डोस देण्यात येईल. या लसीच्या पहिल्या दोन चाचण्यांचे अहवाल हे सकारात्मक आले असून, कंपनीला तिसऱ्या क्लिनिकल चाचणीसाठी परवानगी देण्यात आली आहे.
लसीचे नेमके महत्व कोणते?
▪️ केंद्रातील मोदी सरकारने 30 कोटी लसमात्रांची ऑर्डर नोंदवली असून, त्यामुळे 15 कोटी लोकांचे लसीकरण करता येणार आहे.
▪️ लसीच्या प्री-क्लिनिकल आणि क्लिनिकल चाचण्यांना केंद्र सरकारने पाठिंबा दिला. तसेच 1500 कोटी रुपयांचे आर्थिक पाठबळ दिले आहे.
▪️ लसींचा तुटवडा देशात भासत असताना कोर्बेव्हॅक्सच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यात आले आहे.
दरम्यान, मोदी सरकारने 30 कोटी डोससाठी ‘बायोलॉजिकल-ई’ कंपनीला 1500 कोटी रुपये देणार हे नक्की झाले आहे. म्हणेजच एका डोससाठी कंपनीला साधारणतः 50 रुपये एवढा खर्च येऊ शकतो. मात्र खासगी बाजारात लसीची किंमत ठरली नसली, तरी जगातील ही सर्वात स्वस्त लस असल्याचं म्हटलं जातंय.