Maharastra मागील आठ दिवसांपासून राज्यात सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेनं दाखल केलेली बहुमत चाचणीविरोधातील याचिकेवर सुनावणी करताना शिवसेनेविरोधात निकाल दिल्यानंतर लगेचच मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलाय. मला मुख्यमंत्री पद सोडण्याची खंत अजिबात नाहीय, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी, “आज मला विशेषतः शरद पवार आणि सोनिय गांधी आणि सहकाऱ्यांना धन्यवाद द्यायचे आहे. आज निर्णय घेतांना फक्त चार शिवसेनेचे मंत्री होते. बाकीचे तुम्ही जाणताच. या निर्णयाला कोणी विरोध केला नाही, सर्वांनी मान्यता दिली. ज्यांचा विरोध आहे हे भासवलं जात होतं त्यांनी पाठिंबा दिला,” असं म्हणत सहकारी पक्षांचे आभार मानले.
“ज्यांना दिलं ते नाराज, ज्यांना नाही दिलं ते हिमतीने सोबत आहे, याला म्हणतात माणुसकी, याला म्हणतात शिवसेना,” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पाठिंबा देण्यासाठी शिवसेना भवनावर येणाऱ्या समर्थकांचे आभार मानले. “राज्यपाल महोदयांना धन्यवाद द्यायचे आहेत की त्यांनी लोकशहीचा मान राखलात, एक कॉपी दिल्यावर २४ तासात आदेश दिला,” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी खोचक शब्दांमध्ये राज्यपालांचे आभार मानले. तसेच विधानपरिषदेच्या १२ आमदारांची यादी राज्यपालांनी मंजूर केली असती तर मान अधिक वाढला असता, असंही म्हटलं.

“काँग्रेस बाहेरुन पाठिंबा द्यायला तयार होती, अशोक चव्हाण मंत्रीमंडळ बैठकीनंतर म्हणाले की आम्ही बाहेर पडतो, पण त्यांना सांगा असं वेड्यासारखं वागू नका,” असंही उद्धव ठाकरे म्हणालेत. डोकी फक्त मोजण्यासाठी वापरायची की कामासाठी?, असा प्रश्न विचारत आपल्याला डोकी मोजण्याची इच्छा नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी टीका केली. “मला तो खेळच खेळायचा नाहीय. मला प्रमाणिकपणे असं वाटतं की शिवसेनाप्रमुखांच्या मुलाला मुख्यमंत्रीपदावरुन खाली खेचण्याचं पुण्य मिळत असेल तर ते त्यांना मिळू द्या,” अशी खोचक टीका उद्धव ठाकरेंनी केली.

Share.