कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरीदेखील या लाटेतून शिकण्यासारखी एक महत्त्वाची गोष्ट अशी घडली की, लहान मुलांमध्ये संसर्गाचे प्रमाण वाढू शकते आणि तिसरी लाट कदाचित लहान मुलांवर मोठे संकट आणू शकते हे यातून निदर्शनास आले. आयुष मंत्रालय आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लहान मुलांची काळजी घेण्यासाठी विशेष गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.
यामध्ये कोरोना झाल्यानंतर आणि होऊ नये म्हणून दोन्ही वेळा पालकांनी लहान मुलांची काळजी कशी घ्यावी, हे वयोगटानुसार सांगितले आहे. त्यावरच आज एक नजर टाकूया!
हे नियम मुलांना शिकवा
1. कोणत्याही वस्तूला हात लावल्यावर मुलांना हात धुण्यास सांगा.
2. घराबाहेर पडताना मास्क आवश्यक आहे हे लहान मुलांना सांगा
3. लहान मुलांना हात धुणे व मास्क लावणे का गरजेचे आहे हे सोप्या आणि वैज्ञानिक कारणांसह पटवून द्या.
4. 5 ते 18 वयोगटातील मुलांनी मास्क वापरण अत्यंत गरजेचं आहे.
5. 2 वर्ष ते 5 या वयोगटातील मुलांची इच्छा असेल तेव्हाच त्यांना पालकांनी स्वतःच्या निगराणीत मास्क घालावा.
6. तीन लेअर असलेल्या सुती कपड्याचा मास्क मुलांसाठी योग्य आहे.
7. गरज नसताना मुलांना घराबाहेर पाठवू नका.
8. लहान मुलांना शक्यतो व्हिडीओ कॉल किंवा फोनच्या माध्यमातूनच इतरांच्या संपर्कात ठेवा.
9. जर मुलांमध्ये कोविड संसर्गची लक्षणे आढळल्यास त्यांना घरातील वृद्ध लोकांपासून दूर ठेवा.
लहान मुलांमध्ये आढळून येणारी लक्षणे
चार-पाच दिवस सतत ताप येणे, अन्नावरची वासना उडणे, ऑक्सीजन पातळी 95 च्या खाली जाणे, सुस्ती येणे, अशा गोष्टी आढळून आल्यास लहान मुलांना डॉक्टरांकडे न्यावे.
अशी घ्या मुलांची काळजी
1. दररोज लहान मुलांना कोमट पाणी प्यायला द्या.
2. दोन वर्षांवरील मुलांना सकाळी व रात्री असं दोन वेळा ब्रश करण्याची सवय लावा.
3. पाच वर्षांवरील मुलांची तेलाने मालिश करून घ्या.
4. मुलांना कोमट पाण्याच्या गुळण्या करायला लावा.
5. लहान मुलांच्या नाकात 2 थेंब तेल घालणे, प्राणायम करणे, ध्यान करणे या गोष्टी करा.