गर्भवती महिलांसाठी लस सुरक्षित? लसीकरणाची मार्गदर्शक तत्वे आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर!
कोरोना लसीकरणाचा विषय आला की, गर्भवती महिलांनी लस घ्यावी की नाही यावर अनेक मतं मांडली जातात. तर देशात कोरोनाची तीसरी लाट येण्याची शक्यता देखील तज्ञांनी वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरु आहे. 21जूनपासून देशात 18 वर्षावरील सर्वांचे लसीकरण केल्या जात आहे. मात्र, गर्भवती महिलांच्या लसीकरणाबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता. मात्र आता आरोग्य मंत्रालयाने याविषयीची मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत.
मंत्रालयाने मार्गदर्शक सुचनेत म्हटले आहे की, कोरोना लस सुरक्षित आहे आणि कोविडपासून गर्भवती महिलांचे संरक्षण देखील करते. कोणत्याही औषधाप्रमाणेच, लसीचे काही दुष्परिणाम देखील होऊ शकतात जे सहसा सौम्य असतात. जसे की सौम्य ताप, इंजेक्शनच्या ठिकाणी वेदना होणे किंवा लसीकरणानंतर 1-3 दिवसांपर्यंत अस्वस्थता जाणवते.
गर्भ आणि मुलासाठी लसीचे दीर्घकालीन प्रतिकूल परिणाम आणि सुरक्षितता याबाबत अद्याप आढळून आले नाहीये. मंत्रालयाने म्हंटले आहे की, कोव्हिड -19 लसीकरणानंतर दुर्मिळ प्रमाणात गर्भवती स्त्रियांना काही लक्षणे २० दिवसांच्या आत येऊ शकतात जर हि लक्षणे आढळून आल्यास त्वरित लक्ष द्यावे आणि योग्य ती खबरदारी घ्यावी लागेल, असे मंत्रालयाने म्हंटले आहे.
तसेच जर एखाद्या महिलेस गर्भधारणेदरम्यान कोविडची लागण झाली असेल, तर प्रसूतीनंतर लगेचच लसीकरण करावे, असे देखील मंत्रालयाने मार्गदर्शक सुचनेत सांगितले आहे. शक्यतो गर्भधारणा होण्यापूर्वी लसीकरण करून घ्यावे, असेही आरोग्य मंत्रालयाच्या तत्वांमध्ये सांगण्यात आले आहे.
कोरोनाग्रस्त गर्भवती महिलांमध्ये 95% डिलिव्हरी या सुरक्षित झाल्या असून, मोठ्या प्रमाणात घरच्या घरीच महिला कोरोनावर मात करू शकल्या आहेत. 35 वर्ष वय असणाऱ्या किंवा काही सौम्य आजार असेल तरच त्यांची स्थिती गंभीर होण्याचे प्रमाण जास्त होते. काही प्रकरणात बाळाचे वजन 2.5 किलो पेक्षा कमी आढळून आले आहे.