आता घरच्या घरी करता येणार कोरोना टेस्ट? आणखी एका किटला ‘आयसीएमआर’कडून मंजुरी
कोरोनाची दुसरी लाट ओसरायला लागली असताना, देशभरामध्ये लसीकरणाचे प्रमाणदेखील वाढले आहे. त्याचबरोबर कोरोनाबाधितांच्या संख्येतही मोठी घट होऊ लागली आहे. कोरोनाचा धोका पूर्णपणे टाळलेला नसल्यामुळे घरच्या घरीच कोरोना चाचणी करून घेण्यासाठी आणखी एका चाचणी संचाला आयसीएमआर ने मंजुरी दिल्याची बातमी समोर येत आहे.
बाहेर जाऊन गर्दीत रांगेत उभे राहून टेस्ट करून घेण्यासाठी अनेक जण कंटाळा करतात किंवा वृद्ध व्यक्ती अपंग व्यक्ती यांच्यासाठी हे गैरसोयीचे होऊन जाते. अशामध्ये घरगुती टेस्ट किट उपलब्ध झाल्याने गोष्टी सोप्या होणार आहेत.
आयसीएमआर ने शिकागो येथे असलेल्या अबोट रॅपिड डायग्नोस्टीक डिव्हिजन यांनी विकसित केलेल्या अँटीजन टेस्टला मंजुरी दिली आहे. 5 जुलै नंतर या किटची निश्चित किंमत काय असणार आहे याची माहिती उपलब्ध होईल. कोरोनाची लक्षणे ज्यांना वाटत आहेत अशा लोकांसाठी हे किट बनवले आहे.
गुगल प्ले स्टोअर आणि ॲपल वर टेस्ट किट सेल्युलर ॲप उपलब्ध असेल ते डाऊनलोड करून टेस्ट कशी करायची याची माहिती मिळू शकते. या टेस्ट किट मध्ये एक स्ट्रीप दिलेली असेल.
स्ट्रीपच्या साह्याने टेस्ट करता येईल. टेस्ट झाल्यावर सेल्युलर ॲप वर तुमच्या स्ट्रीप चा फोटो अपलोड करायचा. तुम्ही पॉझिटिव आढळला तर rt-pcr चाचणी करून घ्यावी. ती चाचणी देखील पॉझिटिव आल्यास कोरोनाबाधिताने आरोग्य केंद्राला याची माहिती द्यावी आणि तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा, अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत.
मध्यम किंवा तीव्र स्वरूपाची लक्षणे असतील तर, रुग्णालयात जावे. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना गृह विलगीकरण ठेवता येईल. जमा झालेला डेटा हा कंपनी आणि आरोग्य मंत्रालयाच्या सर्व्हरवर सेव्ह केला जाईल.