राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळं राज्यसरकारने आज मध्यरात्रीपासून कठोर निर्बंध लागू केले आहेत. त्यात नाईट कर्फ्यू सह संचारबंदी करण्यात आली आहे. त्यासोबतच ब्युटी पार्लर, जीम स्विमिंग पूल पूर्ण क्षमतेने बंद करण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला होता. तर क्षमतेच्या 50% हेअर सलून, सिनेमागृह हॉटेल्स सुरु ठेवण्याची परवानगी राज्यशासनाने दिली होती. नंतर ब्युटी पार्लर आणि जीम बंद ठेवण्यावरून राज्यात मोठा वाद निर्माण झाला. सोशल मीडियावर यावरून अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. अखेर राज्य सरकारने वादात सापडलेल्या या निर्बंधांमध्ये बदल करत सुधारित आदेश जारी केले आहेत. त्यानुसार नव्या सुधारित आदेशानुसार 10 जानेवारीपासून राज्यात सलूनसोबतच ब्युटी पार्लर आणि जीम देखील सशर्त सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

राज्य सरकारच्या आदेशात काय?

राज्य सरकारने आपल्या सुधारित आदेशात म्हटले, “ब्युटी पार्लरचा देखील हेअर कटिंग सलूनसोबत समावेश केला जात आहे. यानुसार ब्युटी पार्लर आणि हेअर कटिंग सलून 50 टक्के क्षमतेने सुरू राहू शकतील. ज्या गोष्टींमध्ये तोंडाचा मास्क काढण्याची आवश्यकता नाही त्याच गोष्टी ब्युटी पार्लर आणि सलूनमध्ये करता येतील. हे काम करणाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झालेले असावे. याशिवाय ज्या ग्राहकांचे लसीकरण झाले आहे त्यांनाच येथे प्रवेश असेल.”

जिमबाबत काय आदेश?
“व्यायामशाळा (जीम) देखील क्षमतेच्या 50 टक्के उपस्थितीसह सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, व्यायाम करताना मास्क वापरणे आवश्यक असणार आहे. तसेच व्यायामशाळेत केवळ लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींनाच प्रवेश असेल,” असंही या सुधारित आदेशात नमूद करण्यात आले आहे.

राज्यात सध्या कोणते निर्बंध लागू?

  • पहाटे 5 ते रात्री 11 वाजेपर्यंत 5 किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना एकत्र फिरता येणार नाही.
  • रात्री 11 ते पहाटे 5 या वेळेत अत्यावश्यक सेवा वगळता कुणालाही प्रवास करता येणार नाही.
  • लग्न समारंभासाठी जास्तीत जास्त 50 व्यक्तींच्या उपस्थितीची परवानगी.
  • अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त 20 लोकांना उपस्थित राहता येणार.
  • सरकारी कार्यालयात भेटणाऱ्यांना निषेध, आवश्यकता असल्यासच मुख्य कार्यालयाची लेखी परवानगी आवश्यक.
  • प्रायव्हेट ऑफिसेसमध्ये वर्क फ्रॉम होम, 50 टक्के पेक्षा अधिक जणांना परवानगी नाही
  • सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमांना जास्तीत जास्त 50 लोकांच्या उपस्थितीला परवानगी असणार.
  • शाळा, महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार. यात केवळ 10 वी, 12 वीच्या बोर्डाकडून आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षा इतर सरकारी शैक्षणिक विभागांकडून आयोजिक नियोजित कृतिकार्यक्रमाला अपवादात्मक स्थितीत परवानगी असणार.
  • जलतरण तलाव, व्यायामशाळा, सौंदर्य प्रसाधनगृह बंद राहणार.
  • हेअर सलून 50 टक्के क्षमतेने चालू राहतील, मात्र करोनाबाबच्या सर्व नियमांचं पालन करावं लागणार. याशिवाय दररोज रात्री 10 ते सकाळी 7 वाजेपर्यंत बंद राहतील.
  • जिल्हास्तरीय खेळाच्या स्पर्धांवरही निर्बंध असणार, केवळ पूर्वनियोजित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांना विनाप्रेक्षक परवानगी असणार.
  • प्राणीसंग्रहालय, किल्ले, मनोरंजन पार्क अशी सर्व सार्वजनिक ठिकाणं बंद राहतील.
  • नाट्यगृह, सिनेमागृह 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार आहे. क्षमता बोर्डावर प्रदर्शित करावी.
  • नाट्यगृह, सिनेमागृहात संपूर्ण लसीकरण झालेल्यांनाच परवानगी मात्र रात्री 10 ते सकाळी 8 सिनेमागृहा बंद.

Share.