बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘झुंड’ (Jhund) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांनी केलं आहे. तर बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यामध्ये मुख्य भूमिका साकारत आहेत. ‘झुंड’च्या निमित्ताने नागराज मंजुळे यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. क्रीडा प्रशिक्षक विजय आणि त्यांच्या टीमच्या संघर्षाची झलक या तीन मिनिटांच्या ट्रेलरमध्ये पहायला मिळतेय.
नागराज मंजुळेंच्या दिग्दर्शनाचा ठसा या ट्रेलरमध्ये चांगलाच उमटला आहे. सोनसाखळी चोरणाऱ्या, गांजा विकणाऱ्या, गुंडगिरी करणाऱ्या मुलांची टीम बनवू पाहण्याचं स्वप्न विजय पाहत असतात. मात्र झोपडपट्टीत राहणाऱ्या या मुलांना कॉलेज कॅम्पसमध्ये आणण्याला अनेकांचा विरोध असतो. अशा मुलांचं आयुष्य ते कशा पद्धतीने बदलतात हे प्रेक्षकांना चित्रपटात पहायला मिळेल. दमदार संवाद, अंगावर रोमांच उभं करणारं पार्श्वसंगीत, किंचितही ग्लॅमर नसतानाही लक्षवेधी ठरणारे कलाकारांचे लूक ही या ट्रेलरची काही वैशिष्ट्ये आहेत. यामध्ये अनेक मराठी कलाकारांचे चेहरे पहायला मिळतात. ‘सैराट’ या चित्रपटाची टीम म्हणजेच रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. येत्या ४ मार्च रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.