केळी हे फळ आपल्याकडे वर्षभर आणि सहजासहजी उपलब्ध होणारे फळ आहे. केळी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येक व्यक्तीच्या खाण्यात जाणारे फळ आहे. मात्र हे फळ केवळ चवीलाच गोड असते असे नाही तर यापासून शरीराला अनेक आरोग्यदायी फायदेदेखील मिळतात. त्याचप्रमाणे केळी हे अत्यंत स्वस्त, स्वादिष्ट आणि पचनासाठी सुलभ असणारे फळ असल्याने हे फळ खाणे शरीरासाठी अत्यंत लाभदायी ठरते.
याच अनुषंगाने आपण आजच्या लेखामध्ये केळी खाल्ल्यामुळे होणारे फायदे, यांविषयी माहिती पाहणार आहोत. केळीमध्ये अनेक प्रकारचे विविध पोषकतत्व, जीवनसत्त्वे आणि इतरही घटक असतात. यामध्ये फॉलिक ऍसिड, विविध जीवनसत्व, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि इतरही अनेक पोषक घटक असतात.
हृदय स्वास्थ्यासाठी अनुकूल : आपले हृदय हे शरीरात रक्ताभिसरण प्रक्रिया व्यवस्थित पार पाडण्यासाठी कार्यरत असते. त्यामुळे त्याचे आरोग्य चांगले असणे अत्यंत आवश्यक आहे. केळी खाल्ल्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. केळीमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते, जे हृदयासाठी अनुकूल ठरते. केळीमधील फायबरयुक्त घटकांमुळे हृदयासंबंधित विविध आजार तसेच इतरही समस्यांचा धोका कमी होण्यास मदत होते.
ऊर्जा मिळते : केळी हा शरीराच्या उर्जेसाठीचा एक महत्त्वाचा स्रोत आहे. म्हणूनच जिमला जाणारे किंवा अनेक पहिलवान केळी खाण्याला पसंती देतात. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. एका केळ्यामध्ये अंदाजे 90 कॅलरी असतात, ज्या आपल्या शरीराला अत्यंत फायदेशीर ठरतात. त्यामध्ये अनेक असे पोषकतत्व असतात जे आपली पचनशक्ती आणि वजनावर परिणाम करतात. दररोज केळीचे सेवन केल्यास अनेक आजार दूर होण्यास मदत होते तसेच शरीरदेखील स्वस्त राहते.
मजबूत पचनशक्ती : आपण बघितले की केळीचे सेवन हे आपली पचनशक्ती व्यवस्थित चालण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे पचनसंस्थेतील विकारदेखील दूर होतात आणि अन्नाचे पचन चांगले होण्यास मदत होते. आयुर्वेदामध्ये सांगितल्याप्रमाणे केळीतील गोड-आंबट गुण पचनशक्तीची क्षमता वाढवतो. याचा गोडवा किंवा गोडपणा शरीराला ऊर्जा तर प्रदान करतोच, परंतु अन्नपचन देखील चांगले होण्यास यामुळे मदत होते.
किडनीसाठी फायदेशीर : आपल्या शरीरातील अपायकारक पदार्थ शरीराबाहेर टाकण्यासाठी किडनी अर्थात मूत्रपिंड हा अवयव महत्त्वाची भूमिका बजावतो. हा शरीरातील नाजूक अवयव असल्याने याची काळजी प्रत्येकाने घ्यायलाच हवी. यासाठी केळीचे सेवन मदत ठरू शकते. कारण किडनीचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी पोटॅशियमची आवश्यकता असते आणि हे पोटॅशियम केळीमध्ये मोठ्या प्रमाणात आढळते. दररोज दोन ते तीन केळी खाल्ल्याने किडनी संदर्भातील आजार किंवा विकार ते 30 टक्क्यांनी कमी होतात, असे एका संशोधनातून पुढे आले आहे.
रक्तदाबासाठी : शरीराचा रक्तदाब सामान्य असणे अत्यंत आवश्यक आहे. उच्च रक्तदाब किंवा कमी रक्तदाब असल्यास शरीराला त्याचा अपाय होऊ शकतो. त्यामुळे रक्तदाब सामान्य ठेवण्यासाठी केळीचे सेवनदेखील फायदेशीर ठरते. केळीत मोठ्या प्रमाणात पोटॅशियम असते. ज्यामुळे रक्तदाब तसेच हृदयाचे ठोके यांना सामान्य ठेवून त्यांच्यावर नियंत्रित ठेवणे शक्य होते. याव्यतिरिक्त केळीमध्ये मोठ्या प्रमाणावर मिनरल्स असतात, जे आपल्या मेंदूचा आणि शरीराचा समन्वय साधण्यासाठी कारणीभूत ठरतात.