All new Maruti Alto 2022 : मारुती सुझुकी ही भारतातली सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी आहे. देशातल्या नागरिकांच्या छोट्या हॅचबॅक कार्सच्या मागणीकडे सर्वाधिक लक्ष देत या कंपनीने भारतीय वाहन बाजारावर कब्जा केला आहे. भारतात कमी किंमतीतल्या छोट्या हॅचबॅक कार्स सर्वात जास्त विकल्या जातात, या सेगमेंटवर मारुतीचं वर्चस्व आहे. मारुतीच्या या सेगमेंटमध्ये सर्वात जास्त कार आहेत. मात्र मारुतीची सर्वात मोठी ताकद असलेल्या छोट्या आणि स्वस्त हॅचबॅक कार्सचं भविष्य सध्या अधांतरी आहे. केंद्र सरकारने प्रत्येक कारमध्ये ६ एअरबॅग्स देणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे आता प्रत्येक वाहन उत्पादक कंपनीला त्यांच्या सर्व कारमध्ये ६ एअरबॅग्स द्याव्या लागतील. मात्र या नियमामुळे छोट्या कार बनवणाऱ्या मारुती सुझुकी कंपनीच्या चिंता वाढल्या आहेत.

मारुती सुझुकीचा ऑल-न्यू ऑल्टो यंदा दिवाळीच्या आसपास लाँच होणार आहे. मात्र लाँचिंगपूर्वीच या कारशी संबंधित माहिती हळूहळू समोर येऊ लागली आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, मारुतीच्या एंट्री लेव्हल कारचं भविष्य 6 एअरबॅगच्या नियमामुळे अनिश्चित आहे. (S-Presso), सेलेरिओ (Celerio) आणि वेगनआर (WagonR)  एन्ट्री लेव्हल व्हेरिएंटही अडचणीत येऊ शकतात. कारण केंद्र सरकारने अलीकडेच कारमध्ये ६ एअरबॅग देणे बंधनकारक केले आहे. मारुती सुझुकीचे अध्यक्ष आर. सी. भार्गव यांनीही याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

छोट्या गाड्यांना धक्का

‘इकॉनॉमिक टाइम्स’शी बोलताना भार्गव यांनी नव्या कायद्यामुळे भारतातील छोट्या गाड्यांच्या भविष्याबद्दल चिंता व्यक्त केली. ही छोटी कार सहा एअरबॅग बसवणार का, याबाबत भार्गव यांनी चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले, ‘सर्व छोट्या गाड्यांमध्ये सहा एअरबॅग असतीलच याची खात्री देता येत नाही. तसेच, आणखी चार एअरबॅग जोडल्यास कारच्या किंमतीत लक्षणीय वाढ होईल आणि देशातील छोट्या कार विक्रीला त्याचा मोठा फटका बसेल.”

खर्च ६० हजार रुपयांनी वाढणार

सध्या सर्व वाहनांमध्ये दोन एअरबॅग असणे आवश्यक आहे. एक ड्रायव्हरसाठी तर दुसरा ड्रायव्हरच्या शेजारी बसलेल्या प्रवाशासाठी. जुलै 2019 पासून चालकांसाठी एअरबॅग अनिवार्य करण्यात आल्या होत्या, तर पुढील प्रवाशांसाठी एअरबॅग 1 जानेवारी 2022 पासून अनिवार्य करण्यात आल्या आहेत. मारुती आपल्या एन्ट्री-लेव्हल मॉडेलमध्ये चार एअरबॅग देण्याचे काम करत आहे. या एअरबॅग वाढवल्यानंतर कारच्या किंमतीत 60 हजार रुपयांची वाढ होणार आहे.

Share.