सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाने भारत सरकारने लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने 1 मे पासून देशातील 18 वर्षांवरील सर्व व्यक्तींच्या लसीकरणाला परवानगी देत असल्याची घोषणा सोमवारी केली.
या निर्णयाचं आपण स्वागत करत असल्याचं ‘कोव्हिशिल्ड’ची निर्मिती करणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. नव्या धोरणामुळे लसीकरणाची क्षमता वाढवता येईल तसेच राज्य सरकार, खासगी रुग्णालये आणि लसीकरण केंद्राना थेट लस देता येईल यासंदर्भात सीरमने समाधान व्यक्त केलं आहे.
त्याचसोबत सीरमने खुल्या बाजारात लसीची किंमत किती असेल याचीही माहिती दिली आहे. अदर पुनावाला यांनी प्रसारमाध्यमांना लसीच्या किंमतीसंदर्भात माहिती दिलीय.
सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड लसीचा एक डोस सरकारी हॉस्पिटलसाठी 400 रुपयांना तर खासगी हॉस्पिटलसाठी 600 रुपयांना उपलब्ध करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानंतर पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटने लसीच्या किंमतीची घोषणा केली आहे. प्रत्येक व्यक्तीला दोन डोस घ्यावे लागणार आहेत.
IMPORTANT ANNOUNCEMENT pic.twitter.com/bTsMs8AKth
— SerumInstituteIndia (@SerumInstIndia) April 21, 2021
सीरम इन्स्टिट्यूटच्या अदार पुनावाला यांनी सांगिंतलं की, येत्या दोन महिन्यात आम्ही लसीचे उत्पादन वाढवणार आहोत. सीरम इन्स्टिट्यूटच्या उत्पादन क्षमतेच्या एकूण 50 टक्के लसी या भारत सरकारला देण्यात येतील तर 50 टक्के लसी राज्य सरकार आणि खासगी हॉस्पिटलना देण्यात येतील.
सीरम इन्स्टिट्यूटने असा दावा केला आहे की, त्यांची लस जगातील इतर लसींच्या तुलनेत स्वस्त आहे. जागतिक लसींचा विचार करता अमेरिकेत फायझर आणि मॉडर्नाची लस ही 1500 रुपयांना मिळते तर रशियाची स्पुटनिक व्ही लस ही 750 रुपयांना मिळते. तसेच चीनच्या लसीची किंमतही 750 रुपये इतकी आहे. त्यामुळे भारतात विक्री करण्यात येणारी कोविशिल्ड त्या तुलनेत स्वस्त आहे.
दरम्यान, भारत सरकारच्या आदेशानुसार आम्ही लसींची किंमत निश्चित केली आहे. त्यानुसार राज्य सरकारांना प्रत्येक लस ही 400 रुपयांना दिली जाईल तर खासगी रुग्णालयांसाठी प्रत्येक लस 600 रुपयांना विकली जाईल असं सीरमने म्हटलं आहे.
सध्या लस निर्मिती आणि एकंदरित यंत्रणेवरील ताण पाहता सर्व खासगी कंपन्यांना सीरमने राज्यांच्या माध्यमातून किंवा खासगी रुग्णालयांच्या माध्यमातून लस घेण्याचं आवाहन केलं आहे. चार ते पाच महिन्यांनंतर लस खुल्या बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध करुन दिली जाईल असंही सीरमने म्हटलं आहे.