या सरकारी योजनेद्वारे सुरू करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अधिक!
दुखणे म्हंटले की, आजारी माणसाच्या काळजीपेक्षा जास्त काळजी इलाजवर होणाऱ्या खर्चाची वाटावी, अशा प्रकारचे दुखणे आजकाल ऐकायला मिळतात. कमी पैशात औषधे उपलब्ध होणार असतील तर, सगळ्याच गोष्टी सामान्य लोकांसाठी सोप्या होऊ शकतात.
तुम्ही याच गोष्टीचा व्यवसाय करू शकता, तेही सरकारी योजनांचा योग्य मार्गाने उपयोग करून! केंद्रीय रसायन आणि खतमंत्री मनसुख मांडविया यांनी नुकतेच हिमाचल प्रदेशच्या कांगडा जिल्ह्यातील प्रागपूर येथे जनऔषधी केंद्राचे उद्घाटन केले.
मार्च 2024 पर्यंत देशभरात पंतप्रधान जनऔषधी केंद्र योजनेतंर्गत अशाप्रकारची 10 हजार आस्थापने उघडण्याचा मानस यावेळी त्यांनी जाहीर केला. सध्या देशात 7,836 जनऔषधी केंद्रे आहेत.
जन औषधी केंद्र सुरु करण्यासाठी केंद्र सरकारने तीन वर्ग तयार केले आहेत. यामध्ये बेरोजगार फार्मासिस्ट, सामान्य व्यक्ती, डॉक्टर आणि नोंदणीकृत मेडिकल व्यावसायिक हे केंद्र सुरू करू शकतात.
त्याचबरोबर ट्रस्ट, स्वयंसेवी संस्था, खाजगी रुग्णालये, या द्वारे देखील जन औषधी केंद्र सुरू करता येते. तिसऱ्या गटामध्ये राज्य सरकारकडून शिफारस करण्यात आलेल्या कोणत्याही संस्थांचा समावेश यामध्ये होऊ शकतो.
याद्वारे कमाई करणे देखील सोपे आहे. जन औषधी केंद्राच्या माध्यमातून येणाऱ्या उत्पन्नाचा 20 टक्के वाटा हा दुकान चालवणाऱ्या व्यक्तीला दिला जातो.
याशिवाय संबंधित व्यावसायिकाला प्रोत्साहन म्हणून काही भत्ता देखील मिळतो. सरकार दुकान उघडण्यासाठी आलेला खर्च देखील परत देते. फर्निचर, कम्प्युटरसाठी 50 हजारांपर्यंत रक्कम देखील दिली जाते. मात्र ही रक्कम तुम्हाला टप्प्याटप्प्याने मिळते. हे केंद्र सुरू करण्यासाठी रिटेल सेल्सचा परवाना घ्यावा लागतो.
https://janaushadhi.gov.in/ या संकेत स्थळावर जाऊन फॉर्म देखील डाऊनलोड करू शकता. हा फॉर्म भरून ब्युरो ऑफ फॉर्मा पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग ऑफ इंडिया जनरल मॅनेजर कडे पाठवावा लागतो.