बॉलिवूडमध्ये आतापर्यंत अनेक दिग्गजांच्या जीवनावर आधारित अनेक चित्रपट तयार करण्यात आले आहेत. उदा : जयललिता आणि इंदिरा गांधी यांच्या नंतर आता आणखी एक चित्रपट चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.
दरम्यान, मागील अनेक वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजाच्या जीवनावर आधारित चित्रपट बॉलिवूडमध्ये तयार करण्यात येणार असल्याचे वृत्त येत होते. तर अभिनेता रितेश देशमुखने यासाठी प्रयत्न देखील सुरू केल्याचे वृत्त समोर आले होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट तयार करण्यात येणार असून, या चित्रपटात शिवाजी महाराजांच्या भूमिकेत शाहिद कपूर दिसण्याची शक्यता आहे. ‘कबीर सिंह’ चित्रपटाचे निर्माते अश्विन वर्दे लवकरच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचे काम सुरु करणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातील अनेक सरदारांच्या जीवनावर आधारित खूप मोठे बजेटचे चित्रपट आले असून , यामध्ये ‘तान्हाजी- द अनसंग वॉरिअर’ चित्रपट हिट झाला होता. तर काही काळातच सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्यावर देखील चित्रपट येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिनेमासाठी साउथ चित्रपटसृष्टीतील लायका प्रोडक्शन या बड्या कंपनीसोबत हातमिळवणी केली आहे. तर या चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुख्य भूमिकेसाठी शाहिदला विचारणा करण्यात आलीय. शाहिदने यासाठी होकार देखील दिल्याचे कळते आहे.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित भव्यदिव्य चित्रपटांची प्रतीक्षा शिवप्रेमींना आहे. बॉलिवूडमधील अनेक निर्माते हे छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट बनविण्यास इच्छूक असल्याचे दिसून आले आहे. यामध्ये रोहित शेट्टी, अली अब्बास जफर, रितेश देशमुख यांचा समावेश आहे. मात्र आता यात भर पडली आहे.