केंद्र सरकारने येत्या 31 ऑगस्टपासून एका नव्या नियमाची अंमलबजावणी करायचे ठरवले आहे. त्यानुसार हॉलमार्किंगसाठी सराफा व्यापाऱ्यांना केवळ एकदाच नोंदणी करावी लागेल. नंतरच्या काळात नुतनीकरणाची गरज भासणार नाही. हॉलमार्किंगच्या नियमाचा व्यापारी आणि ग्राहक या दोघांनाही फायदा होणार आहे.
दागिनांचे हॉलमार्किंग झाले आहे की नाही, हे तपासणे आणि हॉलमार्किंग झालेलेच दागिने खरेदी करणे हे ग्राहकांचे कर्तव्य असणार आहे.
हॉल मार्किंग म्हणजे काय?
सोने, चांदी आणि प्लॅटिनमच्या शुद्धतेचे प्रमाणिकरण करण्याचे एक साधन म्हणजे हॉलमार्किंग. एखाद्या धातूची विश्वासार्हता प्रदान करण्याचे माध्यम म्हणजे हॉलमार्किंग असे म्हटलं जाते. हॉलमार्किंगची संपूर्ण प्रक्रिया देशभरातील हॉलमार्किंग केंद्रांवर केली जाते. त्याचे निरीक्षण भारतीय मानक ब्युरो (BIS) द्वारे केले जाते. जर दागिन्यांवर हॉलमार्क असेल तर ते शुद्ध आहे, असे प्रमाणित केले जाते.
हे आहेत फायदे!
हॉलमार्किंग असलेला दागिना खरेदी केल्याच्या काही वर्षांनंतर विकायला काढल्यास त्याचे मूल्य घटणार नाही. हे सोने पूर्णपणे शुद्ध असल्याने तुम्हाला विक्रीनंतर दागिन्याची संपूर्ण किंमत मिळेल.
हॉलमार्किंगमुळे व्यापाऱ्यांचा खर्च वाढणार!
केंद्र सरकारने सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क बंधनकारक केल्यामुळे लहान व्यापाऱ्यांच्या खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे पेढ्यांवर संगणक आणि हॉलमार्किंगविषयी ज्ञान असलेले कर्मचारी ठेवावे लागतील. याशिवाय, हॉलमार्किंगसाठी दागिने पाठवायचे असल्यास ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पार पडते. लहान व्यापाऱ्यांना याचे ज्ञान नसल्याने मोठे नुकसान होणार आहे.
भारतीय मानक ब्युरो (BIS) मूळ हॉलमार्क हे त्रिकोणी आकाराचे आहे. त्यावर हॉलमार्किंग सेंटरच्या लोगोसह सोन्याची शुद्धताही लिहिलेली असते. तसेच त्या दागिन्यांच्या उत्पादनाचे वर्ष आणि निर्मात्याचा लोगो देखील त्यावर असतो.