खरा पाहता ग्राहक म्हणजे बाजारपेठेतील राजा. आजच्या जागतिकीकरणाच्या स्पर्धात्मक युगात ग्राहक राजाला महत्त्वाचा घटक समजले जाते. ग्राहक हा बाजारपेठेतील आर्थिक उलाढाल आणि खरेदी-विक्रीचा मुख्य केंद्रबिंदू मानला जातो.
ग्राहक या नात्याने तुम्हाला अनेक अधिकार दिलेले आहेत आणि या अधिकारांची माहिती घेऊन तुम्ही जागरुक ग्राहक देखील बनू शकता. शिवाय या अधिकारांची माहिती असल्यामुळे तुम्ही फसवणुकीपासून देखील वाचू शकता.
एखादी वस्तू किंवा सेवा विकत घेताना ग्राहकांचे हक्क आणि जबाबदाऱ्या काय असतात, याविषयी आंतरराष्ट्रीय ग्राहक हक्क दिनानिमित्त जाणून घेऊयात ‘ही’ खास माहिती.
वस्तू खरेदी करताना ‘ही’ घ्या काळजी :
▪️ फसव्या जाहिरातींना बळी पडू नका.
▪️ वस्तू खरेदी करताना एम.आर.पी पेक्षा जास्त रक्कम देऊ नका.
▪️ वस्तूंची खरेदी करताना बिल मागणे हा ग्राहकांचा अधिकार आहे.
▪️ सोने खरेदी करताना हाॅलमार्ककडे लक्ष द्या.
▪️ डबाबंद खाद्य पदार्थांची व्यवस्थित पाहणी करा.
▪️ वस्तू खरेदी करताना एक्सपायरी डेट तपासा.
▪️ पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना शून्य तपासा आणि त्यानंतरच पेट्रोल भरा.
▪️ ऑनलाइन खरेदी करताना सजग राहा.
▪️ वस्तू खरेदी करताना त्याची पूर्ण माहिती जाणून घ्या.
▪️ ग्राहकांना संरक्षणाचा, माहिती मिळवण्याचा, निवड करण्याचा अधिकार ग्राहकांना आहे.
▪️ अनेकदा खरेदी करतांना किंवा सर्विसेसचा वापर करतांना ग्राहक बऱ्याच गोष्टींकडे दुर्लक्ष करतात आणि याचाच फायदा विक्रेते घेतात. त्यामुळे ‘जागो ग्राहक जागो’.
सरकारकडूनही ग्राहकांच्या जनजागृतीसाठी वेळोवेळी जाहिराती जारी केल्या जातात. तुमची फसवणूक होत असेल तर त्याची तक्रार कुठे करावी, याची माहिती तुम्हाला जाहिरातीमधून मिळते. कुणाकडून तुमची फसवणूक झाली असेल तर तुम्ही संबंधित विक्रेत्याला धडा शिकवू शकता आणि तुमची नुकसान भरपाईही मिळवू शकता.
फसवणूक झाल्यास… :
ग्राहक संरक्षण कायदा 1986 नुसार ग्राहकांना वस्तू निवडणे, त्याची गुणवत्ता आणि दर्जा याचे प्रमाण जाणून घेण्याचा अधिकार आहे.
ग्राहकांची फसवणूक रोखण्यासाठी जिल्हा ग्राहक मंच, ग्राहक न्यायालय आणि जिल्हा तक्रार निवारण ही प्रणाली राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर कार्यरत आहे.