एखादी गोष्ट खरेदी करताना चिकित्सक मनोवृत्तीने ग्राहक प्रत्येक गोष्ट तपासत असतात. इलेक्ट्रॉनिक वस्तू असो किंवा घरात घेण्यासाठी कोणतेही मोठे सामान असू द्या. वॉरंटी आणि गॅरेंटी या दोन्ही गोष्टी, त्यातला फरक आणि त्यात असणाऱ्या अटी याबद्दल आपल्याला सविस्तर माहिती असणे ग्राहक म्हणून गरजेचे आहे. ग्राहकांची जागरूकता खरेदी आणि विक्री मधला व्यवहार पारदर्शक होण्यासाठी गरजेचे असते आज आपण याबद्दल जाणून घेऊया!
गॅरंटी काय आहे?
जेव्हा एखाद्या वस्तूमध्ये दोष असेल आणि त्या वस्तूची गॅरंटी असल्यास दुकानदार किंवा कंपनीला ते उत्पादन बदलून द्यावे लागते. म्हणजेच तुम्ही नादुरुस्त वस्तू दुकानात घेऊन जाता आणि कंपनी त्याच्या जागी नवीन वस्तू देते. जुन्या सदोष वस्तूच्या बदल्यात नवीन वस्तू देण्याची गॅरंटी दिली जाते.
वॉरंटी म्हणजे काय?
ही गॅरंटीपेक्षा बरीच वेगळी आहे. गॅरंटीमध्ये ज्याप्रमाणे एखादी वस्तू सदोष असताना पूर्णपणे बदलली जाते, त्याचप्रमाणे ती वॉरंटी अंतर्गत बदलून मिळत नाही. यामध्ये खराब झालेली वस्तू बदलली जात नाही, उलट ती दुरुस्त केली जाते. उदाहरणार्थ, समजा तुम्ही घरात मिक्सर आणले आणि ते वॉरंटी कालावधीतच खराब झाले, तर कंपनी ते दुरुस्त करते, यासाठी तुमच्याकडून शुल्क आकारले जात नाही.
वॉरंटीच्या अटी काय?
कंपनीने एखादे उत्पादन वॉरंटीच्या अटीवर दिले तर, अनेकदा कंपनी त्याचा एखादा पार्ट खराब झाला तर तो दुरुस्त करण्यासाठी बांधील असते. मात्र कोणता अपघातात किंवा जाणीवपूर्वक खराब झालेल्या गोष्टींना दुरुस्त करून देण्यासाठी शुल्क आकारले जाते. त्याचबरोबर त्या वस्तू मधला एखादा पार्ट नव्याने टाकायचा असेल तर त्याचे देखील पैसे आकारले जातील, अशा काही अलिखित अटी वॉरंटी मध्ये असतात. वॉरंटी ही एका लिमिटेड पिरेड साठी असते. एका ठराविक कालावधीनंतर म्हणजे जसं की एक वर्ष किंवा दोन वर्षाच्या वॉरंटी नंतर कंपनी कुठलीही गोष्ट दुरुस्त करून देण्यासाठी किंवा त्याचा पार्ट बदलण्यासाठी बांधील नसते.