कोरोना मुळे अनेक क्षेत्रांचे भवितव्य बदलले आहे. बऱ्याच कंपन्या कायमस्वरूपी वर्क फ्रॉम होम देण्याकडे कल दाखवत आहेत. अशातच एक दीड वर्षांपासून बरेच कर्मचारी घरून काम करतात.
कोरोना काळामध्ये प्रतिकारशक्ती चांगली असणे किती महत्त्वाचे आहे हे आपण सर्वजण जाणतोच! मात्र तुम्ही वर्क फ्रॉम होम करत असाल तर, तुम्ही तुमच्या शरीराची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.
कोणत्या गोष्टी या काळात लक्षात ठेवणे गरजेचे आहे, यावर आपण एक नजर टाकू:
कामासाठी वेगळी खोली निवडा
घरून काम करताना घरातील काम आणि ऑफिसमध्ये काम यामध्ये अंतर आहे हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. तुम्ही ऑफिसमध्ये जाताना ज्या पद्धतीने घरच्या सगळ्या गोष्टी मागे ठेवून जाता, त्या पद्धतीने काम करतानाही घरातील इतर कामांकडे लक्ष न देणे योग्य ठरते. यामुळे, तुमचे लक्ष फक्त तुमच्या ऑफिसमध्ये कामाकडेच राहते. यासाठी घरामध्ये ऑफिसच्या कामाची वेगळी खोली असणे गरजेचे आहे.
खाण्याच्या वेळा पाळा
जेवणा खाण्याच्या वेळा घरून काम करत असताना, अनेकदा बदलत राहतात. यामुळे आपल्या आरोग्यावर थेट परिणाम होतो हेही आपल्या लक्षात येत नाही. कोणतेही काम करण्याआधी तुमच्या खाण्यापिण्याच्या वेळा व्यवस्थित सांभाळल्या जातायत ना याकडे लक्ष देणे गरजेचे असते. यातून तुमची प्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत होते.
कॅफेन चे प्रमाण जपूनच
अनेकांना कामादरम्यान काही वेळाने चहा-कॉफी घेण्याची सवय असते. दिवसातून एक ते दोन वेळा चहा घेणे योग्य! मात्र, काम झाले की मध्ये मध्ये ब्रेक घेऊन जर तुम्ही कॅफेन तुमच्या शरीरात घेत असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. घरी असल्यामुळे जवळ स्वयंपाक घर असते. त्यामुळे सतत चहा करुन पीत राहणे, किंवा झोप टाळण्यासाठी सतत कॅफेन घेत राहणे, या पद्धतीने तुम्ही तुमच्या आरोग्य धोक्यात टाकू शकता. त्यामुळे या गोष्टींकडेही लक्ष देणे गरजेचे ठरते.
बसण्याच्या पद्धतीकडे लक्ष द्या
तुम्ही कामाला बसण्याची योग्य पद्धत पाळत आहात का याकडेही लक्ष द्या. पाठीला बाक येणे किंवा मणक्याचे त्रास चुकीच्या पद्धतीने खुर्चीत बसल्याने होऊ शकतात. आता हॉस्पिटलमध्ये जाणे सुद्धा सध्या काळजीने करणे गरजेचे आहे, त्यामुळे अशी दुखणी टाळा!
पाणी भरपूर प्रमाणात प्या
पाण्याचे प्रमाण शरीरात व्यवस्थित असले की, शरीरातील ऑक्सिजनची पातळी देखील व्यवस्थित राहते. त्यामुळे एका जागी काम करत असाल तर आवर्जून स्वतःजवळ पाण्याची बॉटल भरून ठेवा, आणि त्यातून सतत पाणी पीत राहा. यामुळे तुम्हाला होणारे युरिन इन्फेक्शन किंवा पाण्याच्या कमतरतेमुळे होणारे डिहायड्रेशन यासारखे प्रकार होणार नाहीत. तुमच्या शरीरात पाण्याची पातळी व्यवस्थित राहिल्याने शरीरातील तरतरी देखील व्यवस्थित राहील आणि तुम्हाला नेहमीच फ्रेश वाटेल!