राज्य मंडळाचा दहावीचा निकाल अखेर काल जाहीर झाला. त्यानंतर आता अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची एकच धांदल उडेल. यंदा परीक्षा न होता अंतर्गत मुल्यमापन पद्धतीने सर्व गुण देण्यात आले आहे. त्यानंतर आता अकरावीची प्रवेश प्रक्रिया कशी असेल याचा प्रश्न सर्वांचं पडला आहे..
दरवर्षी दहावीच्या निकालानंतर मुलांची सीईटी परीक्षांची तयारी सुरु होते. अकरावी सामायिक प्रवेश परीक्षांची (CET) तारीख बोर्डाकडून जाहीर करण्यात आली असून अकरावी प्रवेशासाठी CET परीक्षेची ऑनलाईन नोंदणी येत्या 19 जुलै म्हणजेच सोमवार पासून सुरु होणार असल्याची माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली आहे.
अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणारी सीईटी परीक्षा 21 ऑगस्ट पर्यंत घेण्यात येणार असून ओएमआर उत्तरपत्रिकांद्वारे ऑफलाइन पद्धतीने ही परीक्षा होणार आहे. दरम्यान, राज्याचा दहावीचा निकाल 99.95 टक्के लागला असून दरवर्षी प्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली असून राज्यात मुलींचा निकाल 99.96 टक्के आहे तर मुलांचा निकाल 99.94 आहे.
कशी कराल CET ची ऑनलाईन नोंदणी?
राज्य मंडळाच्या अधिकृत वेबसाइट वर जा.
विद्यार्थ्यांचा दहावीचा आसन क्रमांक टाकून सीईटी परीक्षेचा अर्ज भरता येईल.
तिथे दहावीच्या निकालाचे गुण अपडेट केलेले असतील.
त्यानंतर पुढे तुमच्यासमोर परीक्षेसाठी इच्छुक आहात का? किंवा नाही असे दोन पर्याय समोर येतील. योग्य पर्याय निवडून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करा.
सीईटी परीक्षांचे स्वरुप कसे असेल?
सीईटी परीक्षा या अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येतात. मात्र ही वैकल्पिक म्हणजेच पर्यायी परीक्षा आहे. यात विचारले जाणारे प्रश्न हे दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असतात. ही परीक्षा OMR पद्धतीची असते. एकूण 100 गुणांच्या परीक्षेत बहुपर्यायी पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. परीक्षा देण्यासाठी 2 तासांचा कालावधी देण्यात येतो. CET परीक्षांमध्ये मिळणाऱ्या गुणांच्या आधारे अकरावी प्रवेश प्रक्रियेला प्राध्यान्य देण्यात येते. त्याचप्रमाणे CET परीक्षांच्या गुणांच्या आधारे कॉलेजमध्ये प्रवेश दिला जातो.
दरम्यान, यंदा राज्यात दहावी उत्तीर्णांची संख्या 16 लाख असली तरी अकरावी प्रवेशाची क्षमता ही निश्चितच जास्त आहे. मागील वर्षी अकरावीच्या उपलब्ध जागांपैकी सुमारे 32 टक्के जागा रिक्त राहिल्या होत्या. त्यामुळे यंदाही अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना अडचण येणार नाही, अशी अपेक्षा शिक्षण विभागाकडून व्यक्त करण्यात आली.