आज दिसणार वर्षातील पहिले खग्रास चंद्रग्रहण; कधी, कुठे आणि कसे दिसणार ग्रहण जाणून घ्या सविस्तर…
साधारणतः कोणतेही ग्रहण धार्मिक आणि खगोलशास्त्रीय दृष्टीकोनातून अत्यंत महत्वाची घटना मानली जाते. यंदाच्या वर्षात पहिले चंद्रग्रहण आज म्हणजे बुधवार 26 मे 2021 रोजी दिसणार आहे. हा दिवस वैशाख महिन्याच्या पौर्णिमेचा दिवस आहे, याला बुद्ध पूर्णिमा असे देखील म्हंटले जाते.
या चंद्रग्रहणाशी संबंधित काही खास गोष्टी :
खग्रास चंद्रग्रहण :
चंद्र, पृथ्वी आणि सूर्य हे सरळ एका रेषेत आल्यानंतर खग्रास चंद्रग्रहणाची स्थिती निर्माण होते. यावेळी चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या सावलीखाली येतो. पण तरीही काही प्रमाणात सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडतोच. यावेळी चंद्राचा हा भाग थोडा लालसर दिसू लागतो.
हे चंद्रग्रहण भारतात कुठे दिसणार :
या ग्रहणावेळी चंद्र बहुतेक भागांत पूर्वपणे क्षितिजाच्या खाली असेल म्हणून भारतात ते दिसणे थोडे कठीण आहे. पण, हे ग्रहण काही मिनिटांसाठी बंगाल आणि पूर्व ओदिशामध्ये दिसेल, ज्यात भारताच्या पूर्व राज्यांच्या अरुणाचल प्रदेश, मिझोरम, नागालँड, मणिपूर, त्रिपुरा, आसाम आणि मेघालय यांचा समावेश असेल.
चंद्रग्रहणची वेळ :
हे चंद्रग्रहण आज दुपारी पूर्व भारतात दिसेल. प्रामुख्याने हे ग्रहण कोलकातामध्ये राहणारे लोक या दृश्याचा आनंद घेऊ शकतील. हे ग्रहण तिथे दुपारी 3:15 ते संध्याकाळी 6:22 दरम्यान दिसणार आहे. या दरम्यान केवळ आणि केवळ हे सुपर मून केवळ 14 मिनिटे 30 सेकंदांपर्यंत असेल. चंद्र हा पृथ्वीपासून सुमारे 3 लाख 84 हजार किलोमीटरवर आहे. 26 मे रोजी तो 3 लाख 57 हजार किलोमीटरवर येणार आहे. त्यामुळे तो मोठा आणि जास्त तेजस्वी दिसेल.