उद्यापासून ऑगस्ट महिना सुरुवात होत आहे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दिवसापासून काही नियमांमध्ये बदल होत असून सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यात उद्यापासून म्हणजेच एक ऑगस्ट पासून आणखी काही बदलांचा समावेश आहे. हे बदल ‘कुछ खट्टा कुछ मीठा’ अशा संमिश्र स्वरुपाचे आहेत. या नियमांमध्ये तुमच्या पगाराशी संबंधित काही बदल, पेन्शन मिळवणे, पेमेंट करणे, रोख रक्कम काढणे, डोअरस्टेप बँकिंगचा लाभ घेणे यासारख्या गोष्टींचा समावेश आहे. त्यामुळे जाणून घ्या, 1 ऑगस्ट पासून कोणते नियम बदलणार आहे त्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे.
एलपीजी गॅस सिलेंडरच्या नव्या किंमती
1 ऑगस्टपासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या (LPG Gas Cylinder Price) नव्या किंमती जारी होतील. दर महिन्याच्या पहिल्या तारखेला या किंमती निश्चिक केल्या जातात. काही वेळा दर कमी-जास्त होतात, तर काही वेळा दर स्थिर ठेवले जातात.
दूसऱ्या बँक ATM मधून पैसे काढणं होणार महाग
रिझर्व्ह बँकेने इतर बँकांच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी इंटरचेंज शुल्क आकारण्यास सुरूवात केली आहे. यानियमानुसार आता 15 रुपयांवरून हे शुल्क 17 रुपये करण्याची घोषणा केली. त्यानुसार, गैर-आर्थिक व्यवहारांसाठी इंटरचेंज फी 5 रुपयांवरून 6 रुपये होणार आहे. साधारण 9 वर्षांनंतर ही फी वाढवली असल्याचे सांगितले जात आहे.
सुट्टीच्या दिवशीही जमा होणार पगार-पेन्शन
१ ऑगस्टपासून आता पगार, ईएमआय आणि पेन्शन सुट्टीच्या दिवशी देखील जमा करण्यात येणार आहे. उद्यापासून नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊस (NACH) ची सुविधा आता आठवड्याच्या सर्व दिवसांमध्ये उपलब्ध असणार आहे. NACH चे काम केवळ पगार आणि व्याज इत्यादी देणे नाही, तर NACH वीज, गॅस, टेलिफोन, पाणी, कर्जाचे हप्ते म्हणजेच EMI, म्युच्युअल फंडातील गुंतवणूक आणि विमा प्रीमियम यासंदर्भात देखील काम आता NACH कडे असणार आहे. आतापर्यंत ही सुविधा फक्त बँकांच्या कामकाजाच्या दिवशी उपलब्ध होती मात्र आता 24×7 ही सेवा असणार आहे.
कार, बाईक्स होणार महाग
टोयोटाने इनोव्हा क्रिस्टाच्या किंमतीत 2 टक्क्यांची वाढ जाहीर केली आहे. जपानी दुचाकी उत्पादक कावासाकी इंडिया आपली मोटारसायकल 6 हजार ते 15 हजार रुपये महाग करणार आहे. टाटा मोटर्सनेही आपल्या गाड्या महाग करण्याविषयी सांगितले आहे. स्टीलसह ऑटोमोबाईल क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाच्या वाढत्या किमतींमुळे कार आणि बाईक महाग होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
लोन आणि एफडीवरील दर बदलू शकतात
4 ते 7 ऑगस्ट दरम्यान रिझर्व्ह बँकेच्या मॉनिटरीपॉलिसीची बैठक होणार आहे. या बैठकीत दरांमध्ये बदल करण्याबाबत निर्णय झाला तर कर्ज आणि एफडीवरील व्याजदर बदण्याची शक्यता आहे.
IPPB आकारणार शुल्क
इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत (india post payments bank) खातं असणाऱ्यांसाठी बँक 1 ऑगस्टपासून डोअरस्टेप बँकिंग (doorstep banking charges) साठी देखील शुल्क आकारणार आहे. सध्या डोअरस्टेप बँकिंगसाठी कोणतंही शुल्क आकारलं जात नव्हतं, मात्र 1 ऑगस्टपासून यामध्ये बदल होणार आहे. 1 ऑगस्टपासून इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत डोअरस्टेप बँकिंग साठी प्रति कस्टमर 20 रुपये प्रति रिक्वेस्ट आकारण्यात येणार आहेत.
-IPPB अकाउंटमध्ये फंड ट्रान्सफर करण्यासाठी 20 रुपये प्लस जीएसटी शुल्क द्यावं लागेल
-दुसऱ्या बँकांमध्ये फंड ट्रान्सफर करण्यासाठी 20 रुपये प्लस जीएसटी शुल्क द्यावं लागेल
-पोस्ट ऑफिसचे प्रोडक्ट्स- सुकन्या समृद्धि खातं, PPF, RD, LRD साठी 20 रुपये प्लस जीएसटी शुल्क द्यावं लागेल
-मोबाइल पोस्टपेड आणि बिल पेमेटंसाठी 20 रुपये प्लस जीएसटी शुल्क द्यावं लागेल.