मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं सापडली होती. स्फोटकं ठेवण्यात आलेली गाडी ही चोरीची असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं होतं. अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या कारच्या मूळ मालकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
नेमके प्रकरण काय..:
मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्याजवळ गेल्या महिन्यात कार आढळली होती. तिची तपासणी केली असता, त्यात जिलेटिनच्या कांड्या आढळल्या होत्या. त्यामुळे खळबळ उडाली होती. तर मनसुख हिरेन हे या कारचे मालक होते. त्यानंतर ते मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर देखील झाले होते. कार चोरीला गेल्याची माहिती हिरेने यांनी पोलिसांना दिली होती.
गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह ठाणे येथील मुंब्रा येथे सापडला असल्याचं विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे. रेतीबंदर येथे हा मृतदेह सापडला असून यामागे काहीतरी गौडबंगाल दिसत असल्याचं देखील फडणवीसांनी म्हटलं आहे.
आत्महत्या केल्याची ठाणे पोलिसांकडून माहिती
ठाणे पोलिसांनी मनसुख हिरेन यांनी कळवा खाडीत उडी मारुन आत्महत्या केली असल्याची माहिती दिली असून अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याची माहिती एएनआयशी बोलताना दिली आहे.
दरम्यान, “मनसुख हिरेन यांच्या व्हॉट्सअप कॉलची चौकशी केला पाहिजे. त्यामधून अनेक गोष्टी बाहेर येतील. मी राज्याला विनंती केली असून हि गोष्ट केंद्रालाही देखील करणार आहे,” असं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.